Discoverइतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha
इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha
Claim Ownership

इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

Author: Sutradhar

Subscribed: 0Played: 1
Share

Description

श्रोतेहो नमस्कार!खास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह!

https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar
38 Episodes
Reverse
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.   एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का!
एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे. हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता.
द्वारकेतला पारिजात वृक्ष कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारदमुनींनी द्वारकेत आल्यावर एकामागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या, की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णानी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या परिजात-हरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊया की श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या एका समारंभात गेले. तिथे इतर देव, गंधर्व, अप्सरा आणि देवर्षी यांच्याबरोबर नारदमुनी उमा-महेश्वरांची आराधना करू लागले.
द्वारकेत आले नारद मुनी एकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं. या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी सोबत बसले तेव्हा तिथे नारदमुनी आले. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीनं नारदांना अभिवादन केलं आणि आपल्या जवळच्या स्थानावर बसवलं.
द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल. आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली केली.... तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे. आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली... ती अशी...
कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर, युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मर्णीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला ज्याची किर्ति चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठाना नुसार विद्वान ब्राम्हणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला जसा आजवर विश्वात कुणीही पहिला नसेल. यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले. ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिरी रंगाचा होता. मुंगूस तिथे येताच जमिनीवर पसरले आणि जोरजोरात आवाज करू लागले. त्याने तिथे असलेल्या सगळ्या ब्राम्हणांचे लक्ष आपल्याकडे खेचले आणि त्यासोबतच त्याने माणसाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मुंगूस म्हणाले, "धर्मराज! हे दिलेलं दान एका गरीब ब्राम्हणाकडून दिल्या गेलेल्या एक किलो पिठाच्या तुलनेत काहीच नाहीये."
एके दिवशी नारदमुनी मनुचा पुत्र प्रियव्रताला भेटायला गेले. प्रियव्रताने ज्ञानी ऋषी नारदांचं सन्मानानं स्वागत केलं आणि यथोचित आदरातिथ्य केलं. ज्ञान प्राप्तीच्या इच्छेपोटी त्यानं नारदमुनींना अनेक प्रश्न विचारले, पण त्याची ज्ञानर्जनाची तहान काही शमेना. त्याने नारदमुनींना प्रश्न केला"मुनिवर ! जेंव्हा काहीही घडणार असेल तेंव्हा देवांना त्याचे पूर्वानुमान असते, पण मला तुमच्याकडून अशा घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे जी अद्भुत आणि विचित्र असेल” नारदमुनींनी अगदी प्रसन्न चित्ताने स्वतःशी निगडीत एक विचित्र आणि अद्भुत घटना सांगितली ती अशी की ते साक्षात माता सावित्रीलाच ओळखू शकले नव्हते. एकदा नारदमुनी श्वेतद्वीप नावाच्या क्षेत्री गेले होते. हे स्थळ तिथल्या सुंदर सरोवराकरिता प्रसिद्ध पावले होते आणि नारदमुनी त्या सरोवराचं सौदर्य पाहण्यासाठी आतुर होते. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की सरोवर कमळाच्या फुलांनी भरलेलं आहे आणि एक सुंदर स्त्री एखाद्या पुतळ्यासारखी तेथे निश्चल उभी आहे.
रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकीना आद्यकवी अर्थात सगळ्यात पहिले कवी असं म्हटलं जातं. आणि त्यांनी रचलेल्या श्रीराम कथेला पहिलं महाकाव्य मानलं जातं. एकदा तिन्ही लोकी भ्रमण करणारे त्रिलोकज्ञानी देवर्षी नारद आणि तपस्वी वाल्मिकी दोघांची भेट झाली. वाल्मिकीनी नारद मुनींना विचारलं, "देवर्षी! सांप्रत काळात विश्वात गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ कृतज्ञ, सत्यवादी. धर्मानुसार आचरण करणारा, प्राणिमात्रांचं हित चिंतणारा, विद्वान, समर्थ, धैर्यवान, क्रोधावर विजय मिळवणारा,   तेजस्वी,
च्यवन ऋषि
नामजपाने प्रसन्न होऊन गजाननाने आपल्या भक्ताला साक्षात आपले रूप बहाल केले त्या निस्सीम गणेश भक्ताची नामा कोळ्याची अर्थात भ्रूशुंडी ऋषींची कथा. घनदाट अशा दंडकारण्यात नामा कोळी आणि त्याचे कुटुंब राहात असे. नामा कोळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्या करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तीच त्याची दिनचर्या होती. एके दिवशी समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत होते. नामा कोळ्याने त्यांना पाहिलं. तो आपली कुऱ्हाड घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावला; परंतु त्याने हात उगारताक्षणी त्याच्या हातातली कुऱ्हाड मागच्यामागे गळून पडली, असे तीन वेळा झाले. नामा कोळ्याला काय घडते आहे हे कळेना. त्याची ती अवस्था बघून मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, "अरे, उचल कुन्हाड, मार मला! काय झालं तुझी कुऱ्हाड अशी खाली का पडली ?” हे ऐकून नामा कोळ्याला फार राग आला. त्याने पुन्हा वार करण्यासाठी कुन्हाड उगारली; पण पुन्हा तेच.
गरुडाने आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले.  या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रम्हदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाला आणि त्याला दर्शन दिलं. ब्रह्मदेवाने शेषनागाला विचारलं, "शेषा! तुझ्या कठोर तपश्चर्येचं प्रयोजन काय आहे? तू स्वतःला इतका त्रास का देतो आहेस?" शेषाने ब्रह्मदेवाला सांगितलं, "भगवंता, माझे सर्व भाऊ अतिशय मूर्ख आहेत आणि नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. विनता आणि तिचे पुत्र अरुण आणि गरुड यांच्याशी न बोलून मी वैर ओढवून घेतलं आहे. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मला माझ्या भावांपासून दूर राहाता यावं हेच माझ्या तपाचं हेच उद्दिष्ट आहे.
"पक्षीराज गरूड़चा जन्म कसा झाला? तो सापांचा शत्रू आहे?" आपल्या नाग पुत्रांच्या मदतीने कद्रूने कपटाने विनता विरुद्ध पैज जिंकली आणि विनता तिची दासी बनून राहू लागली. आपल्या पहिल्या पुत्राच्या अरूणच्या शापामुळे दास्यत्वाचे जीवन जगणारी विनता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची प्रतीक्षा करू लागली.   योग्य वेळ येताच विनताच्या दुसऱ्या अंड्यातून महाशक्तीशाली गरूडाने जन्म घेतला. त्याची शक्ती गती दीप्ती आणि बुद्धी विलक्षण होती. डोळे वीजेसमान पिवळे आणि शरीर अग्नीसम तेजस्वी होतं. जेव्हा आपले विशालकाय पंख फडफडवत तो आकाशात भरारी घेत असे तेव्हा वाटे साक्षात अग्नीदेवच येत आहेत. जेव्हा गरूडाने आपल्या आईला दासीच्या रूपात पाहिलं तेव्हा त्याने तिला त्याचं कारण विचारलं. विनताने गरूडाला कद्रू सोबतच्या पैजे विषयी संगितले.
सूर्यदेव चा सारथी - अरुण  सत्ययुगाच्या प्रारंभात ब्रह्मदेवच्या आशीर्वादाने दक्ष प्रजापतिच्या तेरा मुलींचा विवाह प्रजापति मरीचिचा पुत्र ऋषि कश्यप यांच्याशी झाला. कश्यप ऋषि आणि त्यांच्या पत्नींपासून विश्वात अनेक प्रजाती आणि वनस्पतींची उत्पत्ति झाली. हा प्रसंग त्यांच्यातीलच दोन पत्नी कद्रू आणि विनता यांच्याशी निगडीत आहे. कद्रू च्या गर्भातून नाग तसच विनताच्या गर्भातून पक्षीराज गरुड़ आणि सूर्यदेवाचा सारथी अरुण यांचा जन्म झाला. काय आहे ह्यांच्या जन्माची कथा? का असतं गरुड आणि नागचं वैर? या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका कद्रू आणि विनताची ही कथा.  कश्यप ऋषींनी एके दिवशी आपल्या पत्नींना त्यांच्या इच्छेनुसार वर मागायला संगितले. कद्रू ने एक हज़ार तेजस्वी पुत्रांची कामना केली. विनता म्हणाली,"मला कद्रूच्या एक हजार पुत्रांपेक्षाही तेजस्वी असे दोन पुत्र व्हावेत." कश्यप ऋषी, त्यांना इच्छापूर्तीचा वर देऊन आपल्या तपश्चर्येत मग्नत झाले.
ज्यांना दधीची ऋषीची कथा माहीत आहे त्यांना हेही माहीत असेलच की कशाप्रकारे असुर वृत्र कोणत्याही धातूच्या बनलेल्या अस्त्रापासून अवध्य होता आणि त्याचा संहार करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या अस्थी देवराज इंद्राला दान केल्या होत्या. त्याच वृत्रासुराच्या पूर्वजन्माची ही कथा.   शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक राजा होता. ज्याने पूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त केला. राजाची शक्ती इतकी होती की त्याच्या राज्यात राहणार्‍या सर्वांसाठीच्या खाण्याच्या वस्तू आपोआप उत्पन्न होत असत. राज्यात सुख-समृद्धी अशी होती, की प्रजा राजाला दूसरा ईश्वर मान त असे. धन-दौलत, ऐश्वर्य, चित्रकेतूला कशाचीही कमी नव्हती. आपल्या पराक्रम आणि शौर्याने त्याने अनेक सुंदर स्त्रियांचं हृदयही जिंकलं होतं. चित्रकेतूच्या एक कोटी राण्या होत्या. परंतू एवढं ऐश्वर्य असूनही तो निःसंतान होत. त्यामुळेच तो नेहमी चिंतेत असे.  एक दिवस तिन्ही लोकी भ्रमण करण्यासाठी निघलेल्या प्रजापती अंगिरा ऋषीनी चित्रकेतूच्या महाली त्याचं आतिथ्य स्वीकारलं. राजकडे सर्वकाही असूनही त्याचा उदास चेहरा पाहून ब्रह्मर्षीनी याचं कारण विचारलं, चित्रकेतू म्हणाला, "हे भगवान, समग्र सृष्टीतील सगळी सुगंधित फुलं मिळूनही एखाद्या भुकेलेल्या माणसाची भूक शमवू शकत नाहीत, त्याच प्रकारे हे सारं ऐश्वर्य मिळून एका निपुत्रिक पित्याचे दुःख दूर करू शकत नाही. भुकेलेल्याला जशी अन्नाची आवश्यकता असते त्याच प्रकारे, हे भगवान मला एक पुत्र प्रदान करून माझी ही पीडा दूर करा."   त्रिकालदर्शी अंगिरा ऋषींना हे चांगलंच ठाऊक होतं की चित्रकेतूच्या भाग्यात संतान सुख नाहीए. पण त्याच्या हट्टापुढे ब्रह्मर्षीही हतबल झाले. म्हणून एका यज्ञाचं आयोजन करून त्यातून उत्पन्न झालेलं चरू त्यांनी राजाची पट्टराणी कृतद्युतीला दिलं. यथावकाश कृतद्युतीने एका अत्यंत सुंदर पुत्राला जन्म दिला. एक करोड राण्या असूनही निःसंतान असलेल्या चित्रकेतूसाठी पहिल्या मुलाचं सुख स्वर्गावर विजय मिळवण्याच्या आनंदापेक्षाही अधिक आनंददायी होतं. राजकुमाराच्या येण्याने संपूर्ण राज्यात जणू उत्सवाचा माहोल बनला होता.  परंतू हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. राणी कृतद्युतीने राजकुमाराला जन्म दिला होता, त्यामुळे राजाचं सारं लक्ष आपल्या पट्टराणीतच गुंतून राहू लागलं. ते पाहून इतर राण्यांच्या मनात इर्षेची भावना निर्माण झाली. त्यांचा द्वेष इतका वाढला की राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा दोष नवजात बालकाला त्या देऊ लागल्या. त्याच्या मनातील घृणा इतकी वाढली की एके दिवशी रागाच्या भरात त्यांनी छोट्या राजकुमाराला विष दिलं. कृतद्युतीला ही गोष्ट कळेपर्यंत फार उशीर झाला होता. राजकुमारच्या प्राणांनी त्याच्या नश्वर शरीराचा त्याग केला होता.
एकदा कृष्ण आणि बलराम जंगलात काही वेळ मजेत घालवून पुन्हा ब्रिजकडे परतले. ब्रिजला पोहोचताच त्यांनी पहिलं की, इंद्रोत्सवाबद्दल सर्वच गोप खूप आनंदी आणि उत्साही आहेत. हे पाहून कृष्णाला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं, "हा सण का साजरा करतात?"   श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून एक म्हातारा गोप म्हणाला, ''इंद्रदेव हा ढगांचा स्वामी आहे, तोच सर्व जगाचा रक्षणकर्ता आहे. त्यांच्या कृपेनेच पाऊस येतो. पावसामुळे आमची सगळी पिकं हिरवीगार राहतात, आपल्या गुरख्यांना गुरं चारण्यासाठी पुरेसं गवत मिळतं आणि इंद्रदेवाच्या कृपेने कधीही पाण्याची कमतरता भासत नाही, इंद्राच्या आज्ञेने ढग जमा होतात आणि बरसतात. कृष्णा! पाऊस या पृथ्वीतलावर जीवन आणतो आणि देवराज इंद्र खुष राहिला की पाऊस पडतो. त्यामुळे इंद्रदेवाची वर्षा ऋतुत पूजा केली जाते. सगळेच राजे मोठ्या आनंदाने इंद्रदेवाची पूजा करतात, म्हणून आम्हीही सर्वजण तेच करत आहोत . '     श्रीकृष्णाने गोपांचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकलं आणि मग त्याने म्हंटलं, ''आर्य! आपण सर्व जण जंगलात राहणारे गोपाळ आहोत आणि आपली उपजीविका 'गोधना'वर अवलंबून आहे म्हणूनच गायी, जंगलं आणि पर्वत हे आपले देव असले पाहिजेत. शेतकऱ्याची उपजीविका शेती आहे, त्याचप्रमाणे आपल्या उपजीविकेचे साधन गायींचं संगोपन करणं हे आहे. जंगलं आपल्याला सर्वकाही प्रदान करतात आणि पर्वत आपलं संरक्षण करतात. आपण या सर्वांवर अवलंबून आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण गिरियाचना करायला हवी. आपण झाडांजवळ किंवा डोंगराजवळ सर्व गायी एकत्र आणल्या पाहिजेत, त्यांची पूजा केली पाहिजे आणि एखाद्या शुभ मंदिरात सर्व दूध गोळा केलं पाहिजे. गायींना मोरपंखांच्या मुकुटाने सुशोभित केलं पाहिजे आणि नंतर फुलांनी त्यांची पूजा केली पाहिजे. देवांना इंद्राची पूजा करु द्यावी आणि आपण मात्र गिरीराज गोवर्धनची पूजा करू. "
आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात   पाहू.    एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती.   महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्याला हे माहित होतं की तो चंद्रवंशी सम्राट आयु यांचा पुत्र आहे, तसेच मिळालेले इंद्रपद स्वतःच्या अहंकारामुळे  गमावणारा एक  अभागी पुरुषदेखील आहे. सर्परूपी स्वतःची चूक सदैव आठवत आणि त्याबद्दल पश्चात्ताप करत असे, आणि मुक्तीची वाट पहात बसे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती नदी किनारी सर्परुपात राहणारा नहुष जीवजंतू आणि जवळ आलेल्या माणसांना खाऊन आपली भूक भागवत असे. अशा रीतीने आयुष्य घालवत असताना आता नहुष द्वापार युगात येऊन पोचला होता.   वनवासकाळात पांडव फिरत फिरत याच वनात आले जेथे नहुष रहात होता. एकदा अन्नाच्या शोधात भीम चुकून नहुषच्या जवळ गेला. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असलेल्या नहुषाने भीमाला बघून त्याला खायचा निश्चय केला.  सर्परूपी नहुषच्या विशाल आकाराने चकित झालेला भीम क्षणभर जागीच थांबला. जिभल्या चाटत नहुष पुढे झाला. आपल्या बळाचा कायम गर्व असलेल्या भीमाला आज एक साप पकडू पाहत होता आणि सुटण्याची खूप धडपड करुनही भीमाला त्याच्या तावडीतून सुटता येईना.  भीमाला नहुष खाऊन टाकणार इतक्यात तेथे धर्मराज युधिष्ठीर आला. भीम इतका वेळ का परतला नाही या चिंतेत युधिष्ठीर त्याला शोधत तेथे आला होता.  आपल्या महा-बलशाली भावाला एका सापाच्या तावडीत सापडलेला पाहुन युधिष्ठिराच्या ये लक्षात आलं की हा कुणी साधासुधा साप असणे शक्य नाही.  “हे सर्पा, मी युधिष्ठीर आहे. तू ज्याला खायला निघाला आहेस तो माझा धाकटा भाऊ आहे. कृपा करून तू त्याला सोड. मी त्याच्या बदल्यात तुला दुसरं उत्कृष्ट अन्न द्यायचं वचन देतो.” भीमाला वाचवण्यासाठी युधिष्ठिराने सापाला सांगितले.   “हे कुंती पुत्रा, तू कोण आहेस हा मला चांगले माहित आहे, आणि तुझ्या भावालाही मी ओळखतो. पण भुकेच्या आगीमुळे माझा नाईलाज झाला आहे. खूप दिवसांपासून उपाशी असल्यामुळे भीमासारखा धष्टपुष्ट माणूस खाऊनच  मी माझा जीव वाचवू शकतो. तू परत जा. आज मी भीमाला खाणार हे नक्की !” भुकेने कासावीस झालेला नहुष म्हणाला.  “थोडा थांब सर्पश्रेष्ठा, तू नक्कीच कुणीतरी वेगळा आहेस. कुणीतरी देवता, दैत्य किंवा गंधर्व ? नक्कीच तुझ्याकडे एक अलौकिक शक्ती आहे. त्याशिवाय हजार हत्तीचे बळ असणाऱ्या भीमाला असं पराजित करणं हे कुणा साध्यासुध्या सापाला जमणं शक्य नाही. कृपा करून आपली ओळख सांगा !” असे म्हणून युधिष्ठिराने यह कह कर नहुषाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला.     “उत्तम ! हे कुंतीपुत्रा, मला माहित होतं की तू मला नक्कीच ओळखशील. मी तुझे पूर्वज चंद्रवंशी राजे आयु यांचां पुत्र नहुष आहे. माझ्याच एका चुकीमुळे एकेकाळी इंद्रासनावर बसणारा हा नहुष अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झाला आणि आज सर्प योनीत जगत आहे. पण त्या शापावर अगस्त्य ऋषींनी मला हे वरदानही दिले होते की जो माझ्या जवळ येईल त्याची शक्ती मला पाहताच क्षीण होईल आणि मी त्याला सहज खाऊ शकेन!” अशा रीतीने नहुषने आपला सगळा वृतांत धर्मराजाला सांगितला. “हे आयुपुत्रा! माझा प्रणाम स्वीकार कर ! तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. चंद्रवंशाच्या सुरुवातीच्या काळात जे  महान शासक होऊन गेले त्यांच्याविषयी मी फक्त ऐकले होते. आज तुम्हाला भेटायचे सद्भाग्य मला लाभले. पण हे नहुष! तू फक्त आमचा पूर्वजच नव्हेस तर आमचा रक्ताचा नातेवाईकही आहेस. आमच्याही अंगात चंद्रवंशाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे तुझ्याच वंशाच्या भीमाला तू खाणे हे अयोग्य आहे आयुपुत्रा!”  आपल्या शास्त्रज्ञानाचा उपयोग करत युधिष्ठिरानेने नहुषला सांगितले.आतापर्यंत नहुषदेखील धर्मराजाच्या ज्ञानाने आणि चतुराईने प्रभावित झाला होता. तो युधिष्ठिराला म्हणाला “ ठीक आहे पांडुपुत्रा, तू असं म्हणतोस तर मी तुझ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवण्याची एक संधी तुला अवश्य देईन. जर तू माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीस तर मी भीमाला सोडून देईन. नाहीतर तू माझ्या आणि माझ्या अन्नाच्या मध्ये येऊ नयेस!” युधिष्ठिराला सर्परूपी नहुषाने अट घातली.       “ठीक आहे आयुपुत्रा! विचार जे विचारायचे आहे ते. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे !” युधिष्ठिर म्हणाला.  “राजा युधिष्ठिरा ! मला सांग की ब्राह्मण म्हणजे कोण आणि त्याला कसे ओळखावे?”  नहुषने प्रश्न विचारला.“सर्पराज! ज्याच्यात सत्य, दान, क्षमा, सुशीलता, क्रूरतेचा अभाव, तपस्या आणि दया हे सद्गुण दिसतात त्याला ब्राह्मण म्हटले आहे. जाणण्यायोग्य तत्व तर परब्रम्हच आहे जे दुःख आणि सुखांपासून दूर आहे, आणि जिथे पोचल्यावर, किंवा जे जाणल्यावर मनुष्य सगळ्या शोकांपासून मुक्त होतो!” युधिष्ठिराने ने ब्राह्मणाची व्याख्या सांगितली. “पण हे सगळे गुण तर शुद्रांमध्येही असू शकतात!” नहुषने पुन्हा प्रश्न विचारला.“अवश्य...जर शुद्रात सत्य आणि धर्मनिष्ठा इत्यादी उपयुक्त लक्षणे असतील तर तो शुद्र नव्हे तर ब्राह्मण मानला जातो, आणि ज्या मनुष्यात ही लक्षणे नसतील त्याला शूद्रच म्हणायला हवे!” युधिष्ठिराने उत्तर दिले,“हे, धर्मराज, जर एखाद्या व्यक्तीची जात फक्त त्याच्या कर्मावरच ठरत असल तर जन्मानुसार जाती ठरवल्या जाणे कितपत योग्य आहे?” नहुष युधिष्ठिराच्या उत्तरांनी जणू संतुष्टच होत नव्हता.  “हे सर्पराज, या विषयावर स्वयंभू मनु यांनी सविस्तर भाष्य केले आहे, की ज्या बालकाच्या जन्मानंतर त्याला वेदांचे ज्ञान दिले जात नाही ते कुठल्याही जातीत जन्माला आले तरी ते शूद्रच म्हणायला हवे.  त्यामुळे असा नियम आहे की पित्याला आचार्य होऊन व मातेला सावित्री होऊन आपल्या नवजात बाळाला वेदांचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. इतकेच नव्हे सर्पराज, तर स्वयंभू मनु यांनी पुढे म्हटले आहे की मिश्र जातींच्या विवाहसंबंधांमधून जन्माला आलेल्या बालकांच्या जातीची ओळखल तोपर्यंत पटणे अशक्य आहे जोपर्यंत ती त्यांच्या जातीला साजेसे गुण दाखवायला लागत नाहीत. हे नहुष, धर्माचे अचूल आचरण करून व सत्याच्या मार्गाचा स्वीकार करून कुठलाही शुद्र ब्राह्मण होऊ शकतो आणि यांचे पालन न करणारा, पण ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला  कुणीही शुद्र होऊ शकतो !” युधिष्ठिराने नहुषला जातीची व्याख्या सांगितली.  वेदज्ञ नहुषाबरोबर ज्ञानाची चर्चा करताना युधिष्ठिरानेही त्याला धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारले.  सगळ्यात पहिला प्रश्न असा होता, की मनुष्याला मोक्षप्राप्ती कशी होऊ शकते? याला उत्तर देताना नहुष म्हणाला “हे भरतवंशी, जो मनुष्य उचित दान धर्म करतो , सदैव गोड आणि सत्य बोलतो, तसेच कुठल्याही प्राण्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही, त्याला मोक्ष मिळणे निश्चित आहे!”   “हे सर्प-श्रेष्ठा, कृपा करून हे सांगा की दान आणि सत्य बोलणे यातील उत्कृष्ट धर्म कोणता?  शिवाय   सदाचार आणि कुठल्याही प्राण्याला इजा न करणे यात कुठल्या प्रकारचे आचरण निवडायला हवे?” या विषयात आणखी माहिती मिळवण्यात युधिष्ठिराला रस होता.   “हे कुंतीकुमारा, हे सगळेच गुण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. परिस्थितिनुसार आणि आवश्यकतेनुसार यांचे स्वरूप ठरते. याशिवाय हेही लक्षात ठेव राजा, की जिथे गोड पण असत्य बोलावे लागेल तेथे सदाचार बाजूला ठेवून सत्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच कुठल्याही प्राण्याच्या जीवाचे मोल हे कुठल्याही दानधर्मापेक्षा जास्त आहे. जर कुणाला इजा न करणे आणि दानधर्म किंवा सदाचार करणे यात निवड करायची असेल तेथे नेहेमीच कुणाला इजा न करण्याला प्राधान्य देणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे!”  नहुषने मोक्षप्राप्तिचा मार्ग दाखवताना युधिष्ठिराला सांगितले. यानंतर स्वर्गप्राप्तिविषयी अधिक जाणून घेण्यासाठी युधिष्ठिराने नहुषला जन्ममृत्युच्या चक्राविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना नहुष म्हणाला “ हे युधिष्ठिरा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे जो मानुष सदाचारी असेल, धर्माचरण करणारा असेल, आणि कुणाला इजा न करणारा असेल त्याला मोक्ष प्राप्ती होते. याच्या उलट आचरण करणारा मनुष्य,  जो सदैव लोभ, क्रोध व कामवासनेने ग्रासलेला असेल , त्याला वारंवार मनुष्य किंवा इतर खालील स्तरावरच्या योनींमध्ये जन्म घेऊन संसारिक कष्ट भोगावे लागतात.  सगळ्याच प्राण्यांमध्ये परमचेतनेच्या रुपात “आत्म्या”चा वास असतो.  हा आत्मा भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी इंद्रियांचा उपयोग करत राहतो. म्हणूनच हे कुंतीकुमारा,  इंद्रियांवर संयम ठेवणे हा आत्म्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे!”  “अति उत्तम। हे सर्परूपी नहुषा, मी तुझ्या ज्ञानाने अत्यंत प्रसन्न झालो आहे.  कृपा करून मला आता हे सांगा की तुझ्यासारखा गुणी धर्मात्मा राजर्षीदेखील हे सगळे ज्ञान असताना आपल्या इंद्रियांवरचा ताबा कसा गमावून बसला, आणि अशा रीतीने शापित झाला?” युधिष्ठिराने विचारले.  “हे धर्मराज, हेच तर नामुष्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे, की सगळे माहित असूनही त्याला हे सत्य माहित नाही.  समृद्धि आणि श्रीमंतीच्या झगमगाटाने मोठे मोठे विद्वानही आंधळे होऊन जातात.  इन्द्रपदाच्या अहंकाराने मीही असाच मूर्खासारखा वागलो. पण तुला धन्यवाद कारण तू इथे येऊन माझ्याशी या ज्ञानाविषयी चर्चा केलीस. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमे तुझ्याशी धर्मसंवाद केल्यामुळेच मला पुन्हा स्वर्गलोकात परतणे शक्य होते. तू आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा केलं आहेस, युधिष्ठिरा!” नहुष म्हणाला.  असे म्हणून सर्परूपी नहुषने भीमाला सोडून दिले. त्याच क्षणी ऋषी अगस्त्यांनी नहुषला दिलेल्या शापाचा अंत झाला. आपल्या मूळ स्वरुपात आल्यावर नहुषाने युधिष्ठिर आणि भीमाला आशीर्वाद दिले आणि आपले नश्वर शरीर त्यागून त्याने स्वर्गलोकाच्या दिशेने प्रस्थान केले.
धन संपत्तीची देवता म्हणून सगळे कुबेराला ओळखतात. परंतु त्यांच्या पूर्वजन्माची कथा मात्र फारच थोड्या लोकांना माहित आहे. शिव पुराणातील या प्रसंगात ऐकूया, की मंदिरात चोरी करणाऱ्या चोराने अजाणतेपणाने केलेल्या कृत्यामुळे त्याला कशाप्रकारे कुबेर पद प्राप्त झालं. आणि कशाप्रकारे त्याला शंकराला प्रिय झाला.  काम्पिल्य गावात यज्ञदत्त नावाचा एक ब्राम्हण राहत होता. त्यांना एक गुणनिधी नावाचा मुलगा होता. गुणनिधी अगदी आपल्या नावाच्या विरूध्द वागत असे. तो दुर्गुणी आणि उध्दट होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून यज्ञदत्तने गुणनिधीचा त्याग केला. त्याला घरातून हाकलले. घरातून बाहेर पडल्यानंतर बरेच दिवस तो उपाशीपोटी भटकत राहिला. एके दिवशी मंदिरातील दान चोरण्याच्या हेतूने तो शंकराच्या मंदिरात गेला. तिथे त्याने आपली वस्त्र जाळून प्रकाश केला. हे कृत्य म्हणजे एकप्रकारे भगवान शंकराला दिप दान केल्यासारखेच झाले. चोरीच्या अपराधात त्याला पकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनीवण्यात आली. त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे यमदूतांनी त्याला बांधून घातले. मात्र शिवगणांनी तिथे येऊन त्याची सुटका केली. भगवान शंकराच्या गणांसोबत राहिल्यामुळे त्याचे मन शुध्द झाले. त्यानंतर गुणनिधी त्या शिवगणांसोबत शिवलोकात गेला. तिथे साऱ्या दिव्य शक्तींचा उपभोग घेतल्यामुळे तसेच शंकर पार्वतीची सेवा केल्यामुळे पुढचा जन्म त्याला कलिंगराज अरिंदम याचा पुत्र म्हणून मिळाला. कलिंगराज याने आपल्या पुत्राचे नाव दम असे ठेवले. दम सतत शिवाच्या आराधनेत असे. लहान असूनसुध्दा तो इतर लहान मुलांसोबत शिव शंकराची भजने गात असे. तारूण्यावस्थेत असताना त्याच्या पित्याचे निधन झाले. त्यानंतर कलिंगच्या सिंहासनावर दम बसला.  राजा दम अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्नतेने सर्वत्र शंकराच्या उपासनेचा प्रसार करू लागला. त्याने आपल्या राज्यातील सर्व गावांमध्ये शिव मंदिरात दिप दानाच्या प्रथेचा प्रचार सुरू केला. त्याने सर्व गावातील प्रधानांना सूचना दिल्या की, त्यांच्या गावाच्या आसपास जेवढीही शंकराची मंदिरे असतील त्या सर्व मंदिरांमध्ये अखंड दिप तेवत राहिला पाहिजे. आयुष्यभर या धर्माचे पालन केल्यामुळे दम राजाकडे मोठी धार्मिक संपत्ती निर्माण झाली. त्यामुळे मृत्यूनंतर तो अलकापुरीचा राजा झाला.  ब्रम्हदेवांचा मानसपुत्र पुलस्त्य याचा पुत्र विश्रवा. आणि विश्रवाचा पुत्र वैश्रवण म्हणजे म्हणजेच कुबेर. त्याने पूर्वजन्मी भगवान शंकराची आराधना करून विश्वकर्माने निर्माण केलेल्या या अलकापुरीचा उपभोग घेतला. त्या युगाची समाप्ती होऊन मेघवाहन युगाची सुरूवात झाली. त्यावेळी यज्ञदत्ताचा पुत्र ज्याने प्रकाश दान केला होता तोच कुबेराच्या रूपामध्ये अत्यंत कठीण अशी तपश्चर्या करू लागला. दिप दानामुळे शंकराकडून मिळणाऱ्या आशिर्वादाच्या ताकदीबद्दल त्याला माहिती होती. त्यामुळे तो शिवाच्या काशी नगरीत गेला. तिथे तो अनन्य भक्तीने, प्रेमाने आणि तन्मयतेने अगदी निश्चल होऊन अकरा रूद्रांचे ध्यान करू लागला. अनेक वर्षे अशी तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर पार्वती देवीसह प्रकट झाले. भगवान शंकरानी अत्यंत प्रसन्नतेने अलकापती कुबेराला पाहिले. आणि म्हणाले, अलकापती, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुला वर देण्यासाठी मी तयार आहे. तुझी मनोकामना मला सांग.  ही वाणी ऐकून कुबेराने डोळे उघडून पाहिले. तर प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर उभे असलेले त्याला दिसले. प्रातःकालच्या सूर्यासारख्या हजारो सूर्यांच्या तेजाने भगवान शंकर तेजस्वी झाले होते तर माथ्यावरची चंद्रकोर चमकत होती. शंकरांच्या या तेजामुळे कुबेराचे डोळेच मिटले. कुबेराने आपले डोळे मिटून घेतले आणि आपल्या मनातील भगवान शंकरांशी तो बोलू लागला. नाथ, माझ्या डोळ्यांना आपण अशी दिव्य दृष्टी द्या की मी आपले तेजस्वी रूप पाहू शकेन. आपले प्रत्यक्ष दर्शन हात माझ्यासाठी खूप मोठा वर आहे. मला दुसरा कोणताच वर नको.  कुबेराचे हे बोलणे ऐकून भगवान शंकरांनी आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि आपले दिव्य रूप पाहण्याची शक्ती त्याला प्रदान केली. दृष्टिची शक्ती मिळाल्यानंतर यज्ञदत्ताच्या पुत्राने डोळे उघडले आणि त्याची नजर पार्वती देवीवर पडली. देवीला पाहून त्याच्या मनात विचार आला की, भगवान शंकरांसोबत ही सर्वसुंदरी कोण आहे? यांनी असा कोणता तप केला जो माझ्या तपश्चर्येपेक्षाही खडतर आहे. हे रूप, हे प्रेम, हे सौभाग्य आणि असीम सौंदर्य सारेच किती अद्भुत आहे. तो ब्राम्हणकुमार पुन्हा पुन्हा हेच बोलून देवीकडे निरखून पाहू लागला. त्याच्या या विचित्र वागणुकीमुळे त्याचा डावा डोळा फुटला. यावर देवी पार्वती, भगवान शंकराला म्हणाली, हा दुष्ट तपस्वी सारखा सारखा माझ्याकडे पाहून काय अर्वाच्य बोलत आहे? देवीच्या या प्रश्नावर हसत हसत भगवान शंकर म्हणाले, हा तुझाच पुत्र आहे आणि हा तुझ्याकडे नजरेने पाहत नाहीय तर तुझ्या अमाप तप संपत्तीचे गुणगान गात आहे. देवीला असे समजावून भगवान शंकर कुबेराला म्हणाले, वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वर देतो की, तु धनाचा राजा तसेच यक्ष, किन्नर आणि राजांचादेखील राजा होशील. पुण्यवान लोकांचा पालक आणि सर्वांसाठी धनाचा दाता होशील. माझ्या सख्या, तुझ्याशी कायम माझे मैत्र राहिल. आणि नेहमीच मी तुझ्या सोबत वास करेन. तुझ्याशी स्नेह वाढवण्यासाठी मी अलकापुरीजवळच वास्तव्य करेन. ये, पार्वती देवीला चरणस्पर्श कर. ही तुझी माता आहे. महाभक्त यज्ञदत्त पुत्र, अत्यंत प्रसन्नचित्ताने तु या पावलांचा आशीर्वाद घे.  अश्याप्रकारचा आशीर्वाद दिल्यानंतर भगवान शंकर, पार्वती देवीला म्हणाले, देवेश्वरी, याच्यावर कृपा कर. तपस्विनी, हा कुबेर,तुझाच पुत्र आहे. भगवान शंकरांनी असे वृत्त कथन केल्यानंतर जगदंबा पार्वती प्रसन्न होऊन यज्ञदत्त पुत्राला म्हणाली, वत्सा, भगवान शंकराचरणी ही तुझी निर्मल भक्ती कायम राहू दे. महादेवांनी तुला जे वर दिले आहेत अत्यंत सुलभतेने तुला त्याच रूपात लाभूदेत. माझ्या रूपाची तुला जी ईर्षा झाली त्यामुळे तु कुबेर या नावाने प्रसिध्द होशील. अश्याप्रकारे कुबेराला वरदान देऊन भगवान शंकर पार्वतीसह स्वगृही निघून गेले. आणि अश्याप्रकारे भगवान शंकरांशी मैत्र प्राप्त करून कैलास पर्वताजवळ अलकापुरीला त्यांचे निवासस्थान झाले.
भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल...      युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत होता. देवता, ऋषि, मुनी, मरुदगण, दिग्पाल, गंधर्व, नाग तथा अप्सरा चारही बाजूंनी इंद्रची पूजा करण्यात मग्न होते. आधीच गर्वाने फुगलेल्या इंद्राला या जयजय कारामुळे अजूनच उकळ्या फुटत होत्या. त्याच वेळी देवगुरू बृहस्पतींच इंद्रलोकी आगमन झालं, देवगुरूना येताना पाहून ना इंद्राने उठून त्यांना अभिवादन केलं की ना बृहस्पतींना आसन ग्रहण करण्यास आमंत्रण दिलं.
वैवस्वत मनूची पहिली मुलगी इला आणि चंद्रपुत्र बुध या दोघांचा पुत्र पुरूरवाने चंद्रवंशाची स्थापना केली आणि अनेक वर्ष धर्माने प्रजापालन केले. महाराज पुरुरवा आणि अप्सरा उर्वशीचा पुत्र आयूने त्यांच्या पश्चात चंद्रवंशाची धुरा सांभाळली आयू आपल्या पित्याप्रमाणेच राजधर्माचे पालन करणारा प्रतापी आणि प्रजावत्सल राजा होता. एवढं ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त करूनही आयूचं मन मात्र नेहमीच नि:संतान असल्याच्या दुःखात बुडून गेलेलं असे. त्यांच्या पश्चात चंद्रवंशाच्या अस्तित्वाचं काय होईल या चिंतेत तो सदैव गुरफटून गेलेला असे.  मनात एका उत्तराधिकार्‍याची कामना घेऊन राजा आयूने महाराणी प्रभा यांच्यासह भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी शंभर वर्ष भगवान दत्तात्र्येयांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा केली. त्यांच्या सेवा आणि भक्तीने संतुष्ट होऊन त्रीदेवांचे अवतार भगवान दत्तात्रेयांनी त्यांना एका चक्रवर्ती पुत्राचं वरदान दिलं. अशा प्रकारे पुत्र प्राप्तीचे वरदान प्राप्त करून महाराज आयू आणि महाराणी प्रभा राजमहालात परतली आणि पुत्रजन्माची प्रतीक्षा करू लागली.
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store