Discoverपंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti
पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti
Claim Ownership

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

Author: Sutradhar

Subscribed: 0Played: 0
Share

Description

आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, "माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग."

सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, "राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते." मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, "मानवाचं जीवन खूपच अनिश्चित आहे आणि अशा प्रकारे सगळी शस्त्र अभ्यासण्यात, वर्ष निघून जातील. हे सारं ज्ञान प्राप्त करण्याचा काही दुसरा उपाय सांगा." तेव्हा सभेत उपस्थित सुमित नावाचा मंत्री म्हणाला, "इथे समस्त शास्त्रांतील विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले विष्णुशर्मा नावाचे आचार्य राहतात. तुम्ही तुमचे पुत्र त्यांच्या ताब्यात द्या. ते अवश्य तुमच्या पुत्रांना कमी कलावधीत समस्त शास्त्रांचं ज्ञान प्रदान करतील."  

सुमतीचं हे बोलणं ऐकून राजाने त्वरित विष्णुशर्माला आपल्या सभेत बोलावलं आणि सांगितलं, "आचार्य! तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या पुत्रांना लवकरात लवकर नीतीशास्त्राचं ज्ञान प्रदान करा. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला शंभर गावं पुरस्कार म्हणून भेट देईन." राजाचं बोलणं ऐकून  विष्णुशर्मा म्हणाले, "राजन माझ्यासारख्या ब्राह्मणाला शंभर गावांचा काय लोभ, मला तुमचा पुरस्कार नको. मी तुमच्या पुत्रांना जरूर ज्ञान प्रदान करेन आणि पुढील सहा महिन्यांत त्यांना नीती शास्त्रात निपुण बनवेन. जर मी असं करू शकलो नाही, तर तुम्ही मला जरूर दंडित करू शकता." विष्णुशर्माची ही प्रतिज्ञा ऐकून समस्त मंत्रीगण आणि राजा खूप खुश झाला आणि तिन्ही राजपुत्रांना त्यांच्या स्वाधीन करून निश्चिंत होऊन राज्य कारभारत व्यग्र झाला.

विष्णुशर्मा तिन्ही राजकुमारांना आपल्या आश्रमात घेऊन आला आणि पशूपक्षांच्या काहण्यांद्वारे त्यांना शिक्षण देऊ लागला. विष्णुशर्माने या कहाण्यांना पाच भागात विभागलं ते अशा असे, पहिला भाग मित्रभेद : अर्थात मित्रांमधील वाद भांडणे, एकमेकांपसून लांब जाणे, दुसारा भाग मित्रसंप्राप्ती म्हणजे मित्र प्राप्ती आणि त्याचे लाभ, तिसरा भाग  काकोलूकीया म्हणजे कावळा आणि घुबडाच्या कथा. चौथाभाग लब्धप्रणाश म्हणजे जिवावर बेतलं, तर काय करायचं आणि पाचवा भाग अपरीक्षितकारक अर्थात ज्या विषयातली माहिती नसले घाईगडबडीने त्यातपावले उचलू नयेत. याच नैतिक काहाण्यांद्वारे विष्णुशर्माने तिन्ही राजकुमारांना सहा महिन्यातच नीतीशास्त्रात विद्वान बनवलं. 

मनोविज्ञान, व्यावहारिक दृष्टीकोण आणि राज्यकारभाराची शिकवण देणार्‍य काहण्यांच्या संकलनाला पंचतंत्र म्हटलं जातं आणि याच कहाण्याच्या माध्यमातून मुलांना रंजक पद्धतीने ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. सूत्रधारच्या या पर्वात आम्ही मुलांना विचारात घेत पंचतंत्राच्या या कहाण्या सादर करत आहोत. 

https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar
25 Episodes
Reverse
भारताच्या दक्षिणेला स्थित, महिलारोप्य नावाच्या शहराबाहेर भगवान शंकराचा एक मठ होता, जिथे ताम्रचूड नावाचा एक भिक्षू शहरातून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे.त्याचं अर्ध पोट भिक्षेने भरायचं आणि अर्ध अन्न तो  पोटलीमध्ये  बांधून खुंटीला टांगायचा. ती  अर्धी भिक्षा तो त्या मठातील सफाई कर्मचाऱ्यांना पगार म्हणून वाटायचा. अशा प्रकारे त्या मठाची देखभाल चांगली चालली होती. एके दिवशी मठाच्या आसपास राहणारे उंदीर हिरण्यक नावाच्या उंदराला म्हणाले, “आम्ही आमची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो, आणि स्वादिष्ट अन्न तिथे खुंटीवर टांगलेल्या पोटलीमध्ये बांधलेले असते. प्रयत्न करूनही आम्ही  त्या खुंटी पर्यंत पोहोचू शकत नाही. तू आम्हाला काही मदत का करत नाहीस?" आपल्या साथीदारांचं  म्हणणं ऐकून हिरण्यक त्यांच्यासह मठात पोहोचला. त्याने उंच उडी घेतली. पोटलीमध्ये ठेवलेलं अन्न त्याने स्वतः खाल्लं आणि आपल्या साथीदारांनाही खाऊ घातलं. आता हे चक्र रोज सुरू झालं. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्याने मठात काम करणं बंद केलं. या सगळ्या प्रकारामुळे  संन्यासी खुप नाराज झाला
शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो ना वा। निरीक्षितौ मया भद्रे दश वर्षाणि पक्ष च॥   ज्याच्या नशिबात लिहिलं आहे, त्याला तेच मिळतं, बघा एकट्या बैलाला मारण्याच्या आशेने कोल्ह्याला पंधरा वर्षं कसं भटकावं लागलं.   एका जंगलात तीक्ष्णशृंग नावाचा बैल राहत होता, तो आपल्या शक्तीच्या आहारी गेला होता, आपल्या कळपापासून तो वेगळा झाला होता आणि एकटाच फिरत होता. तो हिरवे गवत खात असे, थंड पाणी पीत असे  आणि आपल्या धारदार शिंगांनी खेळत असे. याच जंगलात एक लोभी कोल्हा सुद्धा आपल्या कोल्हीणीसोबत राहत होता. एकदा नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या तीक्ष्णशृंगबैलाला पाहून कोल्हीण म्हणाली, हा एकटा बैल किती दिवस जगणार? जा, तू या बैलाचा पाठलाग कर. आता आपल्याला खायला चांगले मांस मिळेल. कोल्हा म्हणाला, " मला इथे बसू दे . इथे  पाणी प्यायला आलेले उंदीर खाऊन आपण दोघेही आपली भूक भागवू. जे मिळू शकत नाही त्यामागं  धावणं  मूर्खपणाचं आहे.” कोल्हीण  म्हणाली, “तू तर मला नशिबाने मिळालेल्या काही गोष्टींवर समाधान मानणारा आळशी वाटतोस . आळस सोडून पूर्ण लक्ष देऊन या बैलाचा पाठलाग केलास  तर नक्की यश मिळेल. तू नाही गेलास तरी मी जाते."   अशा प्रकारे समजावून सांगितल्यावर कोल्हा तयार झाला. कोल्हा बराच काळ  बैलाचा पाठलाग करत होता, पण त्या बैलाची कोणीही आजपर्यंत शिकार करू शकलं नव्हतं . पंधरा वर्ष प्रयत्न केल्यावर कोल्हा आपल्या पत्नीला म्हणाला, "प्रिये ! तुझ्या सांगण्यावरून मी पंधरा वर्षांपासून या बैलाच्या मागे लागलो आहे, त्याला मारण्याची इच्छा आहे, पण हा बैल इतका शक्तिशाली आहे की मला ते शक्य होत नाहीये ." शेवटी, कोल्ह्याचं  म्हणणं मान्य करून  ते दोघेही बैलाचा नाद सोडून माघारी गेले.
सोमिलक नावाचा एक विणकर, जो एका गावात राहत होता, तो एक उच्च दर्जाचा कलाकार होता. तो राजांसाठी उत्तम कपडे विणत असे, पण तरीही तो सामान्य विणकरांइतका पैसा कमवू शकला नाही. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यथित होऊन एके दिवशी सोमिलक आपल्या पत्नीला म्हणाले, "प्रिये ! देवाची ही काय लीला आहे की सामान्य विणकरही माझ्यापेक्षा जास्त कमावतो. मला वाटते की कदाचित ही जागा माझ्यासाठी योग्य नाही,  म्हणून मला दुसऱ्या ठिकाणी जाऊन माझे नशीब आजमावायचे आहे.” अर्थस्योपार्जनं कृत्वा नैव भोगं समश्नुते।  अरण्यं महदासाद्य मूढः सोमिलको यथा॥  संपत्ती प्राप्त करूनही काही लोक त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत, पहा कशा प्रकारे मूर्ख सोमिलक  भरपूर धन कमवूनही शेवटी गरीबच राहिला.  सोमिलाकची बायको म्हणाली, “तुम्ही असा विचार करणं योग्य नाही. भलेही मेरू पर्वतावर जा किंवा मरुस्थलामध्ये राहायला जा, तुम्ही जिथे वाटेल तिथे जा परंतु एक लक्षात घ्या तुम्ही कमावलेल्या धनाचा तुम्ही योग्य वापर केला नाही तर ते धन निघून जाते. यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमचं काम इथे राहूनच करावं. विणकर म्हणाला, "प्रिये ! मी तुझ्या मताशी सहमत नाही. कष्ट करून कोणीही आपले नशीब बदलू शकतो. म्हणूनच मी नक्कीच दुसऱ्या देशात जाईन."   असा विचार करून सोमिलक दुसऱ्या शहरात गेला आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू लागला . काही काळातच त्याने तीनशे सोन्याची नाणी कमावली. मग ती सोन्याची नाणी घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. वाटेत सूर्यास्त झाल्यावर वन्य प्राण्यांपासून बचावासाठी तो झाडाच्या फांदीवर झोपला. मध्यरात्री त्याने भाग्य आणि पुरुषार्थ नावाच्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकले. भाग्य पुरुषार्थाला म्हणाला, जर तुला माहितीये की या विणकाराच्या नशिबात धन नाहीये तर तू त्याला तीनशे मुद्रा का देऊ केल्यास? पुरुषार्थ त्याला म्हणाला, मला त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळवून द्यायचं होतं याउपर तुला सगळंच माहीत आहे.
एकदा एक शिकारी घनदाट जंगलात शिकार करायला गेला. तेवढ्यात त्याची नजर एका काळ्याभोर रानडुकरावर पडली. शिकाऱ्याने आपल्या बाणाने त्याच्यावर हल्ला केला. जखमी डुक्करही वळले आणि शिकाऱ्याच्या छातीमध्ये त्याने आपली शिंगे घुसवली. अशा रीतीने रानडुकराचा बाण लागल्यामुळे मृत्यू झाला आणि शिकारीही रानडुकराच्या शिंगाच्या वाराने मरण पावला. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेलं एक गिधाड तिथे आलं आणि दोघांनाही मेलेले पाहून त्यानं स्वतः च्या नशिबाचं कौतुक केलं आणि म्हणालं , आज देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे असं दिसतंय म्हणून तर न मागता न भटकंती करता इतकं अन्न मला मिळालं.   आणि मग गिधाडाने विचार केला,आता मला हे अन्न नीट पुरवून पुरवून खाल्लं पाहिजे ज्यामुळे माझी गाडी यावरच जास्त काळ चालेल आणि मला अन्नाच्या शोधात जास्त भटकावं लागणार नाही तेव्हा मी या शिकार्‍याच्या धनुष्याला जोडलेली हि दोरी खाऊनच माझी भूक भागवतो असा विचार करून गिधाड धनुष्याची दोरी तोंडात घालून खाणार एवढ्यात ताणल्यामुळे ती दोरी तुटली. आणि धनुष्याचा वरचा भाग गिधाडाच्या छातीत घुसला त्यासरशी तो जोरात ओरडून ,खाली पडला आणि मेला
एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. एका पहाटे ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला , आज दक्षिणायन संक्रांत आहे , आज दान केल्याने चांगले फळ मिळते मी याच आशेने जात आहे. आज तू एखाद्या ब्राह्मणाला भोजन दे. हे ऐकून ब्राह्मण पत्नी म्हणाली , तुम्हाला हे सगळं सांगताना लाज नाही का वाटत? या गरिबाच्या घरात आहेच काय ज्यातून कुणाला भोजन देऊ शकतो ? ना आपल्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत , ना सोनं- चांदी . आपण कोणाला काय दान देणार ?   पत्नीचं हे कठोर बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, "तुझं हे असं बोलणं योग्य नाही. धन तर आजपर्यंत कोणालाच नाही मिळालं, आपल्याकडे जे काही आहे त्यातंलच थोडंफार कोण्या गरजूला देणं हेच खरं दान असतं.   पतीच्या अश्या समजावण्याने पत्नी म्हणाली, ठीक आहे . घरात थोडे तीळ ठेवले आहेत, मी त्यांची सालं काढते आणि त्यातूनच काही बनवून त्या ब्राह्मणाला भोजन देईन.   पत्नीकडून आश्वासन मिळाल्यावर ब्राह्मण दुसर्‍या गावी दान घेण्यासाठी निघून गेला. इकडे ब्राह्मण पत्नी ने तीळ कुटले, धुतले आणि सुकवण्यासाठी उन्हात ठेऊन दिले. तेव्हाच एका कुत्र्याने सुकत घातलेल्या तिळांवर लघवी केली. आता ब्राह्मण पत्नी विचार करू लागली, 'हे तर दुष्काळात तेरावा महिना असं झालं. आता मी कोणालातरी हे धुतलेले तीळ देऊन त्या बदल्यात न धुतलेले तीळ घेऊन येते.'
सर्वेषामेव मत्त्याँनां व्यसने समुपस्थिते।  वाङ्मात्रेणापि साहाय्यं मित्रादन्यो ना सन्दधे॥   संकटकाळी मदतीचं आश्वासनही केवळ मित्राकडूनच मिळू शकतं, जसं चित्रग्रीवाच्या सांगण्यावरून हिरण्यकाने आपल्या मित्राला मदत केली.    एका वनात एका वडाच्या झाडाच्या आधाराने बरेच पशू-पक्षी राहत होते. त्याच झाडावर एक लघुपतनक नावाचा कावळा राहत होता. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात निघाला असताना त्याला एक शिकारी जाळं घेऊन त्याच झाडाजवळ येताना दिसला. तो विचार करू लागला की हा शिकारी तर आपल्या सोबत पक्ष्यांची शिकार करायला आलाय, मी सगळ्यांना आत्ताच सावध करतो.    हा विचार करून तो परत आला आणि आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र करून त्यांना सांगू लागला ,'शिकारी त्याचं जाळं टाकून त्यावर तांदळाचे दाणे पसरवेल आणि जो कोणी ते दाणे खायला जाईल तो त्या जाळ्यात अडकेल.म्हणून आपल्यापैकी कोणीही ते दाणे खायला जायचं नाही.    काही वेळातच शिकार्‍याने त्याचं जाळं पसरवून त्यावर दाणे पेरले आणि तो एका बाजूला जाऊन लपून बसला. बरोबर त्याच वेळी चित्रग्रीव नावाचं कबुतर आपल्या परिवारासोबत अन्नाच्या शोधात तिथे आलं. चित्रग्रीवाने ते तांदळाचे दाणे पाहिले आणि त्याला त्याचा लोभ झाला. कावळ्याने त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु चित्रग्रीवाने त्याचे काहीच ऐकलं नाही आणि ते दाणे खाण्यासाठी आले आणि त्याच्या परिवारासोबत त्या जाळ्यात अडकले.   आपल्या जाळ्यात इतक्या कबुतरांना अडकलेलं पाहून शिकारी खुश झाला आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागला. शिकार्‍याला आपल्या जवळ येताना पाहून कबुतरांच्या प्रमुखाने सगळ्यांना संगितलं , 'तुम्ही सगळेजण या जाळ्यासकट थोडं दूर उडायचा प्रयत्न करा तोपर्यंत मी या जाळ्यातून सुटण्याचा उपाय शोधतो. जर असं नाही केलं तर शिकार्‍याच्या हातात पडून आपण सगळे नक्की मारले जाऊ.
मूर्ख माकड आणि राजा   एक माकड एका राजाचं भक्त होतं आणि राजाचाही त्याच्यावर विश्वास होता. राजाने त्याला आपला अंगरक्षक म्हणून नेमलं होतं. राजवाड्यात कधीही ये-जा करण्याची त्याला परवानगी होती.    एके दिवशी राजा झोपला होता. माकड त्याच्या शेजारी बसून त्याला पंख्याने वारा घालत बसलं होतं. राजाच्या छातीवर एक माशी येऊन बसली. माकडाने तिला पंख्याने बरेचदा हाकलूनही ती पुन्हा पुन्हा येऊन बसत होती.   शेवटी माकडाने एक धारदार तलवार घेतली आणि माशीवर वार केला. माशी तर उडून गेली पण राजाच्या छातीचे दोन तुकडे झाले आणि तो मेला.   म्हणूनच म्हणतात की मूर्खांशी मैत्री करण्याने नुकसान होऊ शकतं.   अशातच, दुसरीकडे एका नगरात एक विद्वान ब्राह्मण रहात होता. पण गरिबीमुळे तो चोर झाला होता. एकदा दुसऱ्या गावातून चार ब्राह्मण त्याच्या गावात आले. व्यापार करून त्यांनी काही पैसे कमावलेले या ब्राह्मणाने पाहिले. त्याच्या मनात आलं “काहीही करून मी यांचे पैसे चोरायला हवेत!” या विचाराने तो या ब्राह्मणांकडे गेला आणि गोडगोड बोलून त्याने त्यांच्याशी जवळीक साधली.    त्या ब्राह्मणांनी कमावलेल्या पैशातून मौल्यवान रत्नं विकत घेतली. ती रत्नं एका पुडीत ठेवून ती पुडी त्यांनी आपल्या मांडीशी बांधून ठेवली. या चोराने हे बघून असं ठरवलं की आपण त्यांच्या सोबतच राहू आणि संधी मिळताच रत्नं चोरू. गोडगोड बोलून तो त्या ब्राह्मणांबरोबर निघाला.   या पाचजणांना रस्त्यात पाहुन कावळे ओरडले “दरोडेखोरांनो! धावा धावा! खूप मालदार माणसं आहेत ही. यांना मारून यांचं धन हिसकावून घ्या!”   हे ऐकून या पाचजणांना दरोडेखोरांनी घेरलं आणि त्यांची झडती घेतली. पण त्यांना काहीच सापडलं नाही. दरोडेखोर म्हणाले “हे कावळे कधीच खोटं बोलत नाहीत. तुमच्याकडे जे काही धन आहे ते मुकाट्याने आम्हाला द्या. नाहीतर आम्ही तुम्हाला मारून ते घेऊ!”    हे ऐकून चोर-ब्राह्मणाने विचार केला की जर दरोडेखोरांनी या ब्राह्मणांना मारलं तर त्यांच्याकडची रत्नं त्यांना मिळतील. मला काहीच मिळणार नाही. शिवाय माझ्याकडेही रत्नं आहेत असं वाटून ते मलाही मारून टाकतील.  या विचाराने तो पुढे आला आणि म्हणाला “दरोडेखोरांनो! असं असेल तर तुम्ही आधी माझीच नीट झडती घ्या!”   त्याबरोबर दरोडेखोरांनी त्याची झडती घेतली आणि काहीच न मिळाल्यामुळे त्याला त्यांनी मार मार मारलं. इतर ब्राह्मणांकडेही काहीच नसेल असा विचार करून दरोडेखोरांनी त्यांना मात्र जाऊ दिलं.   अशा रीतीने एका बुद्धिमान शत्रूने त्या ब्राह्मणांचे प्राण वाचवले. म्हणूनच म्हणतात की विद्वान शत्रू मूर्ख मित्रापेक्षा कितीतरी चांगला असतो.
जीर्णधन बनिये की तराजू  कोण्या एका नगरात जीर्णधन नावाचा एक व्यापारी रहात होता. त्याच्या गाठी असलेलं धन संपलं असता,त्याने दूर देशी व्यापारासाठी जायचा विचार केला.   त्याच्यापाशी त्याच्या पूर्वजांचा एक मोठा जाड जूड तराजू होता. तो एका शेठजिंकडे उधार ठेऊन तो परदेशी गेला. बराच काळ लोटल्यानंतर तो व्यापारी आपल्या शहरी परतला आणि त्या शेठजींकडे जाऊन म्हणाला, "शेठजी! तुमच्याजवळ उधार ठेवलेला माझा तराजू तुम्ही मला परत द्या. शेठ ने म्हंटलं" अरे भावा तुझा तराजू तर माझ्यापाशी नाही. तो तर उंदरांनी खाऊन टाकला. जीर्णधन उत्तरला," आता जर तराजू उंदरांनी खाल्ला असेल तर त्यात तुमची काहीच चूक नाही."  काही विचार करत जीर्णधन पुढे म्हणाला,  "शेठजी! मी आत्ताच नदीकाठी स्नानाला चाललो आहे. माझ्याजवळ एव्हढं सामान आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यासोबत पाठवा." शेठजीनेही विचार केला की हा जर अजून काही वेळ इथे थांबला तर माझी चोरी उघडी पडेल, आणि त्याने आपल्या मुलाला जीर्णधनाबरोबर पाठवून दिले.   शेठजीचा मुलगा आनंदाने जीर्णधनाचे सामान उचलून त्याच्या सोबत निघाला. जीर्णधनाने आपलं स्नान झाल्यानंतर त्या मुलाला एका गुहेत बंद करून त्याच्या दारावर मोठा दगड ठेवला आणि जीर्णधन एकटाच आपल्या घरी परत आला. जेव्हा शेठजींना आपलं मुलगा दिसला दिसेना त्यांनी विचारलं, अरे जीर्णधन! माझा मुलगा कुठे आहे? तो तुझ्याचबरोबर नदीत आंघोळीला गेला होता न? जीर्णधन म्हणाला, "हो! पण एका ससाण्याने त्याला उचलून नेले." शेठ म्हणाला," अरे खोटारड्या! इतक्या मोठ्या मुलाला काय ससाणा उचलून नेणार आहे?माझा मुलगा मला परत दे नाहीतर मी राज सभेत तक्रार करेन." जीर्णधन म्हणाला,"ए सत्यवाद्या, ज्या प्रकारे मुलाला घार उचलून नेऊ शकत नाही, तसच लोखंडी तराजू उंदीर खाऊ शकत नाहीत. जर तुला तुयाजा मुलगा परत हवा असेल तर माझा तराजू मला परत दे."  अशा प्रकारे दोघात वाद वाढला आणि ते भांडत राजसभेत पोहोचले, तिथे पोहोचून शेठ तावातावात मोठ्या आवाजात म्हणाला,"माझ्यावर घोर अन्याय झाला आहे. ह्या दुष्टणे माझा मुलगा चोराला आहे." धर्माधिकार्‍याने जेव्हा जीर्णधनाला शेठजींच्या मुलाला परत देण्यास सांगितलं तसा तो म्हणाला," मी काय करू! मी नदीत स्नानासाठी गेलो होतो आणि माझ्या देखत नदी काठावरून ससाण्याने मुलाला उचलून नेलं." त्याचं बोलणं ऐकून धर्माधिकारी म्हणाला, "तू खोटं बोलतो आहेस. एक ससाणा कधी मुलाला उचलून नेऊ शकतो का?" जीर्णधन उत्तरला, "जिथे उंदीर लोखंडी तराजू खाऊ शकतात, तिथे ससाणा मुलाला नक्कीच नेऊ शकतो." असं म्हणून त्याने राजाला सगळा वृतांत कथन केला. राजाने शेठला जीर्ण धनाचा तराजू परत द्यायला सांगितलं त्यानंतर जीर्ण धनाने शेठजींचा मुलगा त्यांना परत दिला.  अशा प्रकारे जीर्णधनाने आपल्या चतुराई ने आपला तराजू परत मिळवला.
मूर्ख बगळाआणि खेकडा कुण्या एका जंगलात एका झाडावर अनेक बगळे राहत होते. त्याच झाडाच्या ढोलीत एक काळा भयानक साप रहात होता. तो पंख न फुटलेल्या बगळ्याच्या पिल्लांना खाऊन टाकत असे. एकदा तो बगळा साप आपल्या पिल्लांना खाऊन टाकतोय हे बघून दुःखी झालेला बगळा नदी किनारी गेला आणि पाणी भरल्या डोळ्यांनी मान खाली घालून बसला.  त्याला असं पाहून खेकडा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला,"मामा! काय झालं?आज तू का रडतो आहेस? बगळा म्हणाला,"भद्रा! काय करू, झाडाच्या ढोलीत राहणार्‍या सापानी मा पामराचं पिल्लू खाऊन टाकलं. ह्याच कारणाने मी दुःखात आसवं गाळतो आहे. त्या सापाला नष्ट करायचा काही उपाय असेल तर सांग."   त्याचं बोलणं ऐकून खेकड्याने विचार केला हा तर माझा शत्रू आहे, ह्याला असं काही उपाय सांगतो की ह्याची उरली सुरली पिल्लंही नष्ट होतील." असा विचार करून तो म्हणाला,"मामा! जर असं असेल तर तू माश्याचे तुकडे मुंगसाच्या बिळापासून ते सापाच्या ढोलीपर्यंत टाकून दे. असं केल्याने मुंगस त्या मार्गाने जाऊन सापाला मारून टाकेल.  बगळ्याने तेच केलं. माश्याचे तुकडे खात खात मुंगूस सापाच्या ढोलीपर्यंत गेला आणि त्या सापाला मारून टाकलं. सापाला मारल्यानंतर मुंगूसाने एक एक करत झाडावर राहणार्‍या बगळ्यांनाहि खाऊन टाकलं. म्हणूनच म्हणतात कुठलीही ऊपाय योजना करतांना त्याच्या परिणामाचाही विचार करावा.
धर्मबुद्धी आणि पापबुद्धी धर्मबुद्धिः कुबुद्धिश्चः द्वावेतौ विदितौ मम् । पुत्रेण व्यर्थपाण्डित्यात्पिता धूमेन घातितः ॥ धर्मबुद्धी आणि कुबुद्धी या दोघांना मी जाणलं. पुत्राच्या मूर्खतेमुळे त्याचा पिता धूराने मारला गेला.  कोण्या गावात धर्मबुद्धी आणि पापबुद्धी नामक दोन मित्र रहात होते. एके दिवशी पापबुद्धीने विचार केला की मी तर मूर्ख आहे, म्हणूनच गरीब आहे. का न मी धर्मबुद्धीसोबत एकत्र विदेशी जाऊन व्यापार करावा आणि नंतर ह्याला लुबाडुन खूप सारं धन मिळवावं.    असा विचार करून पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"आपण या गावात आपला वेळ व्यर्थ घालवतो आहोत. आपण जर शहरात जाऊन कुठला व्यवसाय केला तर? धर्मबुद्धीने आपल्या मित्राचं म्हणणं मान्य केलं. आणि त्याच्यासोबत शहरात गेला.  दोघ भावांनी अनेक दिवस शहरात राहून व्यवसाय केला आणि उत्तम धन कमावलं. एके दिवशी दोघांनी आपल्या गावी परतायचं मनाशी ठरवलं. गावाजवळ पोचल्यावर पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"मित्रा! इतकी सारी संपत्ती घरी घेऊन जाणा योग्य नाही. आपण यातलं थोडं धन काढून इथेच कुठे जमिनीत पुरलं तर! पुढे जाऊन जशी गरज पडेल इथे येऊन आपण काढून घेत जाऊ. धर्मबुद्धीने त्याला मान्यता दिली. एके रात्री पापबुद्धी जंगलात गेला आणि त्या खड्यातून तिने सारी संपत्ती काढून आणली. दुसर्‍या दिवशी पापबुद्धी धर्मबुद्धीच्या घरी गेला आणि म्हणाला," मित्रा! माझं कुटुंब खूप मोठं आहे. माला घर चालवायला जास्त धनाची आवश्यकता आहे, त्यामुळे आपण जंगलात जाऊन थोडं धन काढून आणू." दोघं एकत्र जंगलात गेले.  जेव्हा दोघांनी मिळून ज्या जागी संपत्ती पुरली होती त्या जागी खोदलं तेव्हा ते धनाचं पत्र रिकामच आढळलं. तेव्हा पापबुद्धी आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाला,"धर्मबुद्धी! तूच हे धन चोरलं आहेस. तुझ्याशिवाय इतर कुणाला ह्या जागेची कल्पनाच नाहीये. आता त्वरित माझा अर्धा हिस्सा मला परत दे नाहीतर माझ्या बरोबर राजसभेत चल, तिथेच ह्याचा निर्णय होईल."
मूर्ख आणि सूचीमुख पक्षी नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया । सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥ नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया । सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥   वाकण्या लायक नसलेले लाकूड वाकत नाही, दगडाने दाढी करता येत नाही आणि अशिष्याला उपदेश करता येत नाही... सूचीमुख याचच उदाहरण आहे.  कोण्या एका डोंगराळ भागातल्या एका जंगलात माकडांची टोळी राहत असे. एकदा पावसात भिजून गारठून गेल्याने ते कुडकुडत होते. काहीतरी करून थंडीपासून बचाव करण्यासाठी आगीसारखे दिसणारे कोरडे गवत त्यांनी एकत्र केले आणि फुंकर मारून त्यातून ऊब निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले.  त्यांना अशा प्रकारे गवताच्या ढीगर्‍याभोवती बसून निरर्थक प्रयत्न कारताना पाहून सूचीमुख नावाचा एक पक्षी त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, "हे काय मूर्खासारखं करताय. अशाने आग पेटणार नाही. इथे थंडीने कुडकुडण्यापेक्षा एखाद्या गुहेत जाऊन तिथे बसून स्वतःचा जीव वाचवा.. ढग गडगडतायत आणि आता अजून जोरात पाऊस पडणार आहे.   त्यांच्यातला एक म्हातारं माकड म्हणाला, "तू तुझं काम कर, आम्हाला ज्ञान शिकवायची गरज नाहीये."  पक्ष्याने म्हातार्‍या माकडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तीच गोष्ट परतपरत सांगू लागला, "अरे माकडांनो असे फुकट प्रयत्न करू नका."  तो पक्षी अजिबातच ऐकेनासा झाला तेव्हा आपले प्रयत्न वाया गेल्यामुळे संतपून एका माकडाने त्याचे दोन्ही पंख पकडले आणि त्याला एका दगडावर आपटून मारून टाकले.  म्हणूनच म्हणतात ज्याची योग्यताच नाही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू नये.
सुतार पक्षी, चिमणी, बेडूक तथा मशीसारख्या सामन्यांचा विरोध केल्यामुळे हत्तीसुद्धा नष्ट झाला होता.  एका जंगलात चटक आणि चटकी नावाचं एक चिमण्यांचं जोडपं एका हिरव्यागार तमालवृक्षावर घरटं बांधून रहात होतं. चटकीने एकदा घरट्यात अंडी घातली. एके दिवशी एक मस्तवाल हत्ती कडक उन्ह टाळण्यासाठी त्या झाडाखाली आला. आपल्या शक्तीच्या मस्तीत त्याने ज्या फांदीवर चिमण्यांचं घरटं होतं तिचं फांदी आपल्या सोंडेत धरून तोडून टाकली.    फांदी तुटल्यामुळे घरटं खाली पडलं आणि त्यातली सगळी अंडी फुटली. साहजिकच चटकी रडू लागली. तिचं रडणं ऐकून तिचा मित्र सुतार पक्षी म्हणाला “कशाला रडतेस? जे गेलं त्यासाठी रडू नये. आपल्याला आपल्या ताकदीला साजेसं जीवन जगायचं असतं!”  हे ऐकून चटक म्हणाला “तुझं म्हणणं बरोबर आहे. पण शक्तीच्या मस्तीत त्या हत्तीने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. तू माझा खरा मित्र असशील तर मला त्याला शिक्षा द्यायचा मार्ग सुचव. मगच आमची पिल्लं गमावल्याचं दुःख कमी होईल!”  सुतार पक्षी त्याच्या मैत्रिणीकडे, म्हणजेच वीणारवा नावाच्या माशीकडे गेला. तिला त्याने सर्व हकीकत सांगितली. माशी त्याला घेऊन मेघनादकडे, म्हणजेच तिच्या एका बेडूक मित्राकडे गेली. सगळ्यांनी चर्चा करून हत्तीला धडा शिकवायची एक युक्ती ठरवली.    मेघनाद माशीला म्हणाला “वीणारवी ! उद्या दुपारी तू हत्तीच्या कानात जाऊन तुझी गोड गुणगुण कर. त्यात गुंग होऊन तो आपले डोळे मिटून घेईल. आणि त्याच क्षणी सुतारपक्षी आपल्या टोकदार चोचेने त्याचे डोळे फोडून टाकेल. आंधळा झाल्यावर तो जेंव्हा पिण्यासाठी पाणी शोधेल, तेंव्हा मी एका खोल दरीजवळ जाऊन जोरजोरात ओरडेन. माझ्या आवाजाने तो जवळ पाणी आहे असे समजून तिथे येईल, आणि दरीत पडून मरून जाईल.     अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून एका भल्यामोठ्या हत्तीलाही आपल्या चातुर्याने मारून टाकलं.  म्हणूनच म्हणतात की अंगात शक्ती कमी असली तरी बुद्धीचा वापर करून बलवान शत्रूचा पराभव करता येतो
संकट येण्याआधीच सावधपणे त्यापासून बचाव करण्याची तयारी करणारा आणि संकट येताच सिद्ध राहून त्याच्यावर मात करू शकणारा...या दोघांना सूख मिळतं आणि त्यांचा विकास होतो. जे नशिबात असेल तेच होईल असा विचार करणारे दैववादी नष्ट होतात.  एका तलावात विधाता, सिद्ध आणि दैववादी अशा नावांचे तीन मासे रहात होते. एके दिवशी काही कोळ्यांनी तो तलाव पाहिला, आणि त्यात खूप मासे आहेत हे पाहुन ते म्हणाले “उद्या आपण इथे मासेमारीसाठी येऊ!” हे ऐकून विधाताने सगळ्या माशांना बोलावलं आणि म्हणाला “त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंत? जिवंत राहायचं असेल तर आज रात्रीच आपल्याला जवळच्या दुसऱ्या तलावात जावं लागेल!’   विधाताचं म्हणणं ऐकून इतर मासे म्हणाले “आपलं घर सोडून आम्ही इतर कुठे नव्या जागेत जाऊ शकत नाही!”  यावर सिद्ध म्हणाला “नव्या जागेत काही नव्याच अडचणी येऊ शकतात. आपण इथेच राहून कोळ्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न करायला हवा!” दैववादी म्हणाला “जे नशिबात असेल ते होणारच. उगाच काहीही प्रयत्न करण्यात अर्थ नाही!” विधाता त्याच्या कुटुंबाला घेऊन रात्रीच दुसऱ्या तलावात गेला.   दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी जाळं टाकलं. त्यात सिद्ध आणि दैववादीसह इतर मासे अडकले.   सिद्धाने जाळ्यात अडकताक्षणीच मेल्याचं सोंग घेतलं. साहजिकच कोळ्यांनी मेलेला मासा म्हणून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिलं. दैववादी आणि इतर माशांना मात्र ते घेऊन गेले.    म्हणूनच म्हणतात की संकट यायच्या आधीच तयार राहणारे, आणि संकट आल्यावर त्यातून सुटकेचा मार्ग शोधणारे सुरक्षित राहतात. सर्वकाही नशिबावर सोडून देणारे मात्र नष्ट होतात.
सुहृदां हितकामानां न करोतीह यो वचः । स कूर्म इव दुर्बुद्धिः काष्ठाभ्द्रष्टों विनश्यति ॥  “जो आपल्या सहृदय हितचिंतकांचा सल्ला ऐकत नाही, तो स्वतःच्या मूर्खपणामुळे खाली पडणाऱ्या त्या कासवासारखा नष्ट होतो” एका तलावात कम्बुग्रीव नावाचं एक कासव रहात होतं. संकट आणि विकट अशा नावाचे दोन हंस त्याचे खास मित्र होते. खूप वर्षांत पाउस न पडल्यामुळे एकदा तो तलाव हळूहळू सुकायला लागला. एके दिवशी याच विषयावर हे तिघे बोलत होते. कासव म्हणालं “मित्रांनो! पाण्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. जीव वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायला हवा!”   हंस म्हणाले “इथून थोड्याच अंतरावर एक मोठा तलाव आहे. त्यात पुष्कळ पाणी आहे. आपल्याला तिथेच जायला हवं!”   यावर कासव म्हणालं “तुम्ही दोघं जाऊन कुठून तरी एक लाकडाची काठी घेऊन या. ती काठी तुम्ही दोन्ही बाजूंनी तुमच्या पंजांमध्ये धरून उडायचं. आणि मी ती काठी दातांनी धरून तिला लटकेन!”   त्यावर हंस म्हणाले “चालेल, आम्ही तू म्हणतोस तसं करू. पण तू कुठल्याही परीस्थितीत तोंड उघडू नको. तोंड उघडलंस तर तू खाली पडून मरशील!”    ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाने दातांनी धरलेली काठी घेऊन उडत निघाले. रस्त्यात त्यांना एक गाव लागलं. हा प्रकार बघून गावकरी चकित झाले आणि म्हणू लागले “अरेच्या! बघा बघा हे पक्षी चक्रासारखं काहीतरी घेऊन उडत चाललेत!”    हे ऐकून कासवाला राहवलं नाही आणि ते म्हणालं “चक्रासारखं काहीतरी नाही, हा मी आहे, कम्बुग्रीव!” हे बोलताना साहजिकच कासवाचं तोंड उघडलं आणि इतक्या उंचावरून खाली पडल्यामुळे ते मेलं.   म्हणूनच असं म्हणतात की आपल्या हितचिंतकांचा सल्ला ऐकावा.
एका समुद्रकिनाऱ्यावर टिटवी पक्ष्यांचं एक जोडपं रहात होतं. त्यातल्या मादीची अंडी घालायची वेळ जवळ आली होती. तिने नराला लवकरात लवकर एखादं शांत ठिकाण शोधायला सांगितलं, जिथे ती अंडी घालू शकेल. नर म्हणाला “हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे, तू इथेच अंडी घाल!” त्यावर मादी म्हणाली “पौर्णिमेच्या दिवशी इथे इतकी मोठी भरती येते की त्यात मोठमोठे हत्तीही वाहून जातात. त्यामुळे तू लवकरात लवकर एखादं दुसरं ठिकाण शोध. नर म्हणाला “तुझं म्हणणं तर बरोबर आहे. पण या समुद्राची काय बिशाद आहे की तो माझ्या मुलांचं काही वाकडं करू शकेल. तू निर्धास्तपणे इथेच अंडी घाल!”          तिकडे समुद्राने त्या दोघांचं बोलणं ऐकलं, आणि मनातल्या मनात म्हणाला “किती पोकळ गर्व आहे या पक्ष्यांमध्ये. रात्री तर असे पाय वर करून झोपतात, की जणू काही आकाशच उचलून धरताहेत. बघूया तरी यांची ताकद!” असं म्हणून समुद्र शांत झाला, आणि टिटवीने किनाऱ्यावर अंडी घातली. दुसऱ्याच दिवशी जेंव्हा हे जोडपं अन्न शोधायला गेलं, तेंव्हा समुद्राला भरती आली. साहजिकच टिटव्यांची अंडी वाहून गेली. ते परत आल्यावर जेंव्हा अंडी जागेवर दिसली नाहीत तेंव्हा मादी संतापाने नराला म्हणाली “अरे मूर्खा! मी तुला म्हटलं होतं की समुद्राच्या भरतीत माझी अंडी वाहून जातील. म्हणून तुला दुसरं ठिकाणही शोधायला सांगितलं होतं. पण तू तुझ्या मूर्खपणामुळे आणि गर्विष्ठपणामुळे माझं ऐकलं नाहीस!”               नर म्हणाला “लाडके, तू काळजी करू नको. मी या समुद्राला सुकवून आपली अंडी परत आणेन!” मग नराने सारस, बदक, मोर इत्यादी मित्रांना बोलावून सांगितलं “मित्रांनो! हा समुद्र आमची अंडी घेऊन गेलाय. याला सुकवून आमची अंडी परत आणण्यासाठी तुम्ही मला मदत करा!”      हे ऐकून त्या पक्ष्यांनी आपापसात चर्चा केली आणि म्हणाले “समुद्र सुकवायची ताकद आमच्यात नाही. मग उगाच श्रम घेण्यात काय अर्थ आहे? गरुडदेव आपले राजे आहेत. आपण सगळेजण जाऊन त्यांना हे सांगूया. ते नक्कीच आपल्याला मदत करतील!”       असा निर्णय घेऊन सगळे पक्षी रडत रडत गरुडदेवांकडे गेले आणि म्हणाले “महाराज! घात झालाय. काहीही कारण नसताना या बिचाऱ्या टिटव्यांची अंडी समुद्राने नेलीत. तुमच्यासारखा शक्तिशाली राजा असताना समुद्राची अशी हिम्मतच कशी झाली!
कोण्या एका जंगलात मदोत्कट नावाचा एक सिंह राहात होता. गेंडा, कावळा आणि गिधाड त्याचे सेवक होते. एक दिवस त्यांना जगला इकडेतिकडे फिरणारा आपल्या तांड्यापासून भरकटलेला क्रथनक नावाचा एक उंट दिसला. उंटाला पाहून सिंह म्हणाला, "वा! हा तर खूपच सुंदर प्राणी आहे. माहिती काढा हा पाळीव आहे की जंगली." हे ऐकल्यावर कावळा म्हणाला, "स्वामी उंट नावाचा हा पाळीव प्राणी तुमचं भोजन आहे. तुम्ही लगेच त्याला ठार मारा." सिंह म्हणाला, "नाही. मी माझ्या घरी आलेल्याला नाही मारणारा. तुम्ही त्याला अभयदान द्या आणि माझ्याकडे घेऊन या. जेणेकरून मी त्याला इथे येण्याचं कारण विचारू शकेन."  सिंहाचं म्हणणं मान्य करून त्याच्या साथीदारांनी उंटाला कसंबसं विश्वासात घेतलं आणि ते त्याला मदोत्कटाकडे घेऊन आले. तेव्हा सिंहाने विचारल्यावर त्या उंटाने स्वतःविषयी सार काही सांगून टाकलं की कशा प्रकारे गावात तो आपल्या मालकासाठी ओझी उचलायचा आणि आज कशा प्रकारे आज त्याची आणि त्याच्या साथीदारांची चुकामुक होऊन तो इथे जंगलात पोचला, हे सगळं त्याने सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून सिंह म्हणाला, "क्रथनक भाऊ, आता तुम्हाला गावी परत जाऊन पुन्हा ओझी उचलण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही आता इथेच आमच्याबरोबर या जंगलात रहा आणि अजिबात न घाबरता हिरव्या लुसलुशीत गवताचा आनंद घ्या.  तेव्हापासून मदोत्कटाच्या संरक्षणात तो हत्ती एकदम निडर होऊन जंगलात राहू लागला
कोण्या एका जंगलात चंडरव नावाचा एक कोल्हा राहात हवा. तो एकदा भुकेने व्याकूळ होऊन अन्नाच्या शोधात एका नगरात जाऊन पोचला. नगरातले कुत्रे त्याला पाहून भुंकत भुंकत त्याच्या मागे धावू लागले. त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तो कोल्हा धावत धावत एका धोब्याच्या घरात घुसला. तिथे निळीच्या पाण्याने भरलेला हौद होता. घाबरलेला कुत्रा गडबडीत त्या हौदात पडला. जेव्हा तो हौदातून बाहेर आला तेव्हा त्याचा रंग निळा झाल्यामुळे कुत्रे त्याला ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्याची पाठ सोडली. निळ्या रंगात रंगलेला कोल्हा हळूहळू जंगलात पोचला.   जंगलातले सगळे प्राणी रंगीत कोल्हा पाहून आश्चर्यचकित झाले आणि घाबरून इकडे तिकडे पळू लागले. इतकंच तर मोठमोठे हत्ती आणि भयानक सिंहदेखील या नव्या प्राण्यामुळे घाबरून गेले. त्यांना घाबरून गेलेलं पाहून चंडरव म्हणाला, "हे जंगली प्राण्यांनो तुम्ही मला बघून का पळून जाताय? मला घाबरू नका. ब्रह्मदेवांनी आजच माझी निर्मिती केली आहे आणि मला जंगलातल्या सर्व प्राण्यांचा राजा बनवून इथे पाठवले आहे. माझं नाव ककुद्द्रुम आहे, आणि साक्षात ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मी तुम्हा सर्वांचा राजा आहे.  त्याचं बोलणं ऐकून सर्व प्राणी म्हणाले, "आज्ञा द्या महाराज!"
एका राजाच्या राजमहालातील एका मनोहर शयनगृहातल्या स्वच्छ कपड्यात एक सफेद ऊ होती. ती राजा झोपी गेल्यानंतर त्यांचं रक्त पिऊन मोठ्या आनंदाने राहात असे. एके दिवशी फिरत फिरत एक ढेकूण तिथे आला. ढेकणाला पलंगावर पाहून ऊ म्हणाली, "तू इथे कसा आलास? तुझ्याविषयी कोणाला काही कळण्याआधी तू जा बरं इथून निघून." त्यावर ढेकूण म्हणला, "अरे! घरी आलेल्या दुष्टाबरोबरही कोणी असं बोलत नाही. मी माझ्या आयुष्यात ना ना प्रकारच्या माणसांचं रक्त प्यायलोय पण अजून एखाद्या राजाचं गोड रक्त प्यायचं भाग्य काही मला लाभलं नाही. घरी आलेल्याला भुकेल्याला भोजनापासून लांब ठेवून असं एकट्यानेच राजाचं स्वादिष्ट रक्त पिणं तुला शोभत नाही.  ढेकणाचं बोलणं ऐकून ऊ म्हणाली. "मी राजा झोपला की त्याचं रक्त पिते. पण तू आहेस वळवळ्या. जर तुला माझ्याबरोबर राजाचं रक्त प्यायचं असेल तर जरा थांब. आणि माझं पिऊन झालं की तू पण मनसोक्त रक्त पिऊन तृप्त हो.  त्यावर ढेकूण म्हणला, "चालेल मी असंच करतो. जो पर्यंत तू राजाचं रक्त पित नाहीस तो पर्यंत मीही नाही पिणार."  अशा प्रकारे ते दोघं एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात राजा तिथे येऊन पलंगावर झोपला. तेवढ्यात ढेकणाच्या तोंडाला सुटलं पाणी. तो लागलीच राजाला चावला.  राजा कळवळून पलंगावरून उठून उभा राहिला आणि आपल्या सेवकांना म्हणला, "बघा रे या चादरीत कुठे ढेकूण किंवा ऊ तर नाहीये नां. जी मला आताच चावली. राजाने असं म्हटल्यावर सेवक बारीक नजरेने चादर पाहू लागले. ढेकूण पटकन पलंगात शिरून लपून बसला. मात्र चादरीवरच्या वळ्यांमध्ये बसलेली ऊ सेवकांच्या दृष्टीला पडली आणि त्यांनी तिला मारून टाकलं.  म्हणूनच म्हणतात, ज्याचा स्वभाव आपल्याला माहीत नाही. त्याला आश्रय देऊ नये.
कोण्याएका जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहात होता. तो ताकदवान असल्यामुळे रोज अनेक हरणं, ससे अशी जनावरं मारूनही तो शांत होत नसे. एके दिवशी जंगलातले सगळे पशू त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, "महाराज, या सगळ्या प्राण्यांना मारून काय फायदा? एका हरणानेही तुमची भूक भागेल. म्हणून तुम्ही आमच्याशी तह करा. आज पासून घरी बसल्याबसल्या तुमच्या भोजनाची सोय म्हणून रोज एक प्राणी पोच होईल. असं केल्यामुळे तुमची उपजीविका पण चालेल आणि आमचाही नाश नाही होणार."  त्यांचं बोलणं ऐकून भासूरक म्हणाला, "हे तुम्ही अगदी योग्य सुचवलंत पण याद राखा, जर एखाद्या दिवशी माझ्या भोजनासाठी प्राणी इथे पोचला नाही तर मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. सगळे प्राणी म्हणाले, "तुमच्या मनाप्रमाणेच सगळं होईल." इतकं बोलून त्यांनी निरोप घेतला आणि ते प्राणी निर्भयपणे जंगलात राहू लागले. रोज दुपारी एक जीव सिंहाकडे पोचत होता.  एके दिवशी सिंहाकडे जाण्याची पाळी सशाची होती. ससा मरणाच्या भयाने घाबरून हळूहळू चालत होता. चालताचालता तो सिंहाला ठार करून आपला जीव कशाप्रकारे वाचवता येईल त्याचा विचार करत होता. वाटेत त्याला एक विहीर लागली. त्याने त्यात वाकून पाहिलं तर त्याला विहिरीत आपलं प्रतिबिंब दिसलं. ते पाहून सशाला सिंहापासून सुटकेचा मार्ग सापडला.  ससा हळूहळू चालत संध्याकाळी सिंहाकडे पोचला. भासूरक भुकेने व्याकुळ झाला होता आणि या छोट्याशा सशाला पाहून तो अधिक संतापला. तो सशावर गरजला, "अरे नीच... एक तर इतका छोटा आहेस आणि याला एवढा उशीर लावलास! याअपराधाची शिक्षा म्हणून आता तुला खाल्यावर सकाळी मी सगळ्या हरणांना खाऊन टाकणार.  ससा अगदी दबक्या आवाजात म्हणाला, "महाराज, यात नं माझी चूक आहे नं इतर जनावरांची"
कोण्या एका जंगलात अनेक जलचरांनी भरलेला एक तलाव होता. तिथे राहणारा एक बगळा म्हातारा झाल्यामुळे त्याला आजकाल मासे पकडता येत नसत. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे तो नदीकाठी बसून आसवं गाळत रडत बसला होता. त्याच वेळी त्याला एका खेकड्याने रडताना पाहिलं आणि कुतूहल आणि सहानभूती पोटी विचारलं, "मामा! आज तुम्ही तुमच्या भोजनाचा शोध घेण्याचं सोडून इथे रडत का बसला आहात?" बगळा म्हणाला, "खरंय तुझं. मासे खाऊन मला आता वैराग्य आलं आहे. आता मी आमरण उपोषण सुरू केलं आहे."   खेकड्याने विचारलं, "काय हो मामा पण तुमच्या या वैराग्याचं नेमकं कारण काय?" बगळा म्हणाला, " अरे याच तळ्यातला माझा जन्म आणि इथेच मी म्हातारा झालो. पण आजच मी ऐकलंय की पुढच्या बारा वर्षात पाऊसच पडणार नाहीये. त्यामुळे आता हा तलाव आटून जाईल आणि इथे राहणार्‍या सर्व प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओढवणार आहे. म्हणूनच मी दुःखी आहे."  खेकड्याने सगळ्या जलचरांना ही बातमी सांगितली. भीतीने घाबरगुंडी उडलेले ते सगळे बगळ्यापाशी आले आणि एका स्वरात म्हणाले, "मामा आमचा जीव वाचवण्याचा काही उपाय आहे का?" बगळा म्हणला, "या तलावापासून काही अंतरावर एक खूप मोठा तलाव आहे. त्यात इतकं पाणी आहे, की बारा वर्षच काय चौवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्यातलं पाणी अटणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर एकेक करून मी तुम्हा सगळ्यांना त्या तलावात नेऊन सोडेन."  अशा प्रकारे बगळा रोज काही मासे तलावातून घेऊन जात असे आणि त्यांना एका खडकावर नेऊन फस्त करत असे. असं अनेक दिवस चाललं आणि धूर्त बगळ्याला विना कष्ट भरपेट भोजन मिळत राहिलं.  एके दिवशी न राहून खेकडा बगळ्याला म्हणाला, "मामा तुमच्याशी सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोललो होतो आणि अजून पर्यंत तुम्ही मलाच त्या तळ्यात सोडलं नाही. तुम्ही कृपा करून माझ्याही प्राणांचं रक्षण करा."  दुष्ट बगळ्याने विचार केला, "रोज रोज मासे खाऊन मलाही आता कंटाळा आलाय. आज या खेकड्यालाच खाऊन टाकतो. असा मनात विचार करून त्याने त्या खेकड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि खडकाच्या दिशेने तो उडू लागला.  खेकड्याला दूरवरून माशांच्या हाडाचा ढीग दिसला. तो पाहून तो घाबरला आणि बगळ्याला म्हणाला, "मामा तो दूसरा तलाव किती लांब आहे? मला एवढावेळ तुमच्या पाठीवर बसवून तुम्ही आता दमला असाल नं!" बगळ्याने विचार केला, "पाण्यात राहणारा हा खेकडा हा माझं काय वाकडं करणार!" आणि म्हणाला, "अरे खेकड्या दूसरा तलाव वगैरे काही नाहीये. इथे मी माझ्या भोजनाची सोय लावून घेतली आहे आणि आजचं माझं भोजन आहेस तू!"  बगळ्याचं हे बोलणं ऐकताक्षणी खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये त्याची मान आवळली आणि त्यामुळे तो दुष्ट बगळा मरण पावला.  बगळा मेल्यावर खेकडा हळूहळू तलावापाशी आला आणि इतरांना त्याने त्या धूर्त बगळयाच्या कावेबाजपणाविषयी सांगून टाकलं.  म्हणूनच म्हणतात, कधीही चंचलवृतीने गरजे पेक्षा अधिक बडबड करू नये.
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store