#1628 : कालभैरवाची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Description
एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ यांच्याकडे गेले, तेथेही अशाच उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून ओमकार स्वरूपिणी त्रिपदागायत्रीकडे गेले. या त्रिपदा गायत्रीने हेच उत्तर दिले. श्री शंकर ह्यांचं रूप ब्रह्मांडात व्यापून राहिले असल्याने, त्यांनी त्यांचे स्वर्गात असलेले शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शोधण्यास पाठविले यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला. पाताळात पाय शोधीत असता श्रीविष्णूंना गणपती दिसले. पण ते ध्यानस्त बसले होते. त्यांना श्रीविष्णूंनी शंकराच्या पायांबाबत विचारलं. तेव्हा गणपती म्हणाले, ‘आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठे ब्रह्मांड दिसलं, होय ना? तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांडं श्री शंकराचे चरणी असल्याने त्यांचे असे वेगळे अस्तित्व दिसणार नाही.’, हे सांगितलेलं विष्णूंना पटलं व मान्यही झाले.